पुणे / प्रतिनिधी :
‘एका थाळीवर, एक थाळी फ्री’च्या असल्याच्या जाहिरातीला भुलून एका महिलेने थाळी बुक केली खरी. मात्र, त्यापायी तिला सायबर चोरटय़ाने तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्हय़ातील संबंधित सायबर चोरटे केरळचे रहिवासी असून त्यांनी पुण्यातील सुकांता हॉटेल येथील फ्री थाळीची ऑनलाईन ऑफर देत फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी शुक्रवार पेठेतील प्राची दिलीप जैन (वय 38) या महिलेने खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, मुन्नर, केरळ) व त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 जुलै 2022 रोजी घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईने फेसबुकवर सुकांता थाळीची एका थाळीवर एक थाळी फ्री, अशी ऑफर असल्याची जाहिरात पाहिली. त्यानुसार तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल नंबरवर फोन केला असता आरोपींनी बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन 1 लाख 99 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याबाबत तक्रारदाराने उशिराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने आरोपींवर विलंबाने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव याबाबत पुढील तपास करीत आहेत.









