आणखी एक तुकडी जम्मूहून रवाना
वृत्तसंस्था/ जम्मू
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसात 2 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. ही यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली असून 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. रविवारी 20 हजारहून अधिक यात्रेकरू दर्शनासाठी पोहोचले होते. तसेच सोमवारी 6,100 यात्रेकरूंची सहावी तुकडी जम्मूहून गंदरबलमधील बालटाल आणि पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पच्या दिशेने रवाना झाली.
अमरनाथमधील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून नव्याने नोंदणी करण्यासाठीही रीघ लागलेली दिसून येत आहे. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांची नोंदणी झाली आहे. 38 दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरून सुरू आहे. गेल्यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालली आणि 5 लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले होते.
अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना अपघात आणि दुर्घटनांचा सामनाही करावा लागत आहे. सोमवारी गंदरबल जिह्यातील झेड-मोड बोगद्याजवळ यात्रेकरूंच्या ताफ्याला घेऊन जाणारी गाडी उलटली. या अपघातात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले. यापूर्वी रविवारी कुलगाममध्ये तीन बसेसची टक्कर होऊन 10 प्रवासी जखमी झाले होते.









