कुंभार्डा येथे दुर्घटना; गावावर शोककळा : कार चालकावर गुन्हा नोंद
खानापूर : खानापूर तालुक्यातील रामनगर-अळणावर मार्गावर कुंभार्डानजीक ओम्नीने जोरदार धडक दिल्याने कुंभार्डा येथील दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास घडली. ऐन दसरा सणादिवशी अपघातात कुंभार्डा येथील दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. घटनास्थळी बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीसप्रमुख रामगोंडा बसरगी आणि बैलहोंगल विभागीय उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांनी भेट देऊन ओम्नीचा तपास लावण्यात यश मिळविले आहे. रामनगर-अळणावर रस्त्यावरील कुंभार्डा येथील शेतकरी रवळू भरमाणी चौधरी (वय 62) आणि सीमा अमर हळणकर (वय 27) यांना जीए 05-डी-1378 या ओम्नीने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रवळू चौधरी हे कृष्णनगर येथील आपल्या शेताकडे चालले होते. तर सीमा हळणकर या मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने चालल्या होत्या. याचवेळी रामनगरहून अळणावरकडे निघालेला ओमनी चालक इरफान अब्दुल सत्तार राहणार फोंडा याने अतिशय वेगाने आणि बेपर्वाईने वाहन चालवल्याने वाहनावरील ताबा सुटला.
रस्त्याच्या कडेने चाललेल्या रवळू आणि सीमा यांना जोरदार धडक दिल्याने दोघेही जवळजवळ 50 फूट उडून फेकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इरफान सत्तार याने आपल्या वाहनासह तेथून पलायन केले होते. या अपघाताची माहिती लेंढा पोलीस स्थानकाला मिळाल्यानंतर लोंढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर याबाबतची माहिती खानापूर पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांना देण्यात आली. लालसाब गवंडी हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ओमनीच्या तपासासाठी टोलनाक्यावरील, तसेच रामनगर आणि कुंभार्डा येथील दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ओमनी चालक अब्दुल सत्तार याला अळणावर येथून ताब्यात घेण्यात आले. अपघातस्थळी बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीसप्रमुख बसरगी आणि बैलहोंगल विभागीय उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांनी भेट देऊन ओमनीचा तपास लावण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या होत्या. ऐन सणादिवशी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने कुंभार्डा गावावर शोककळा पसरली होती. सीमा हळणकर हिचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कुंभार्डा येथे शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.









