सातारा :
सातारा तालुक्यातील चिंचणी येथे एका चार चाकी कारने दुचाकीला आणि एका कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मंगेश श्रीरंग धनावडे (वय 43, रा. मामुर्डी) याचा मृत्यू झाला असून कार चालक वरद राजेंद्र नायडू (वय 27, रा. महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 25 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिंचणी येथील दत्त मंदिराच्या जवळ मंगेश धनावडे याच्या दुचाकीला समोरुन इर्टिंका कारने धडक दिली. त्याच कारने आणखी एका कारला धडक दिली. या अपघातात मंगेशच्या डोक्यास, छातीस, हातापायास दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून यावरुन राजेंद्र धनावडे यांनी वरद नायडू याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
- बावधन येथे अपघातात एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
वाई ते पाचवड जाणाऱ्या रस्त्यावर बावधन गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला काही वाहने उभी असतात. त्यामधील उभ्या असलेल्या एका टेम्पोला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि. 24 रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक मोरे (रा. कुसगाव) याच्या फिर्यादीवरुन त्याचे चुलते संतोष उत्तम मोरे हे दुचाकी चालवत होते. त्या दुचाकीवर दत्तात्रय जायगुडे आणि लहु निगडे हे बसलेले होते. बावधन गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडक बसल्याने त्यात संतोष मोरे यांचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले. यावरुन टेम्पो चालक निलाप्पा शिवाप्पा वाल्मिकी (रा. सऊर कर्नाटक) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








