भुईंज :
राष्ट्रीय महामार्गावर वेळे व जोशीविहीर नजीक दोन ठिकाणी दोन दुचाकीस्वार मालट्रकला धडकल्याने दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. जोशीविहीर येथील अपघात सोमवारी रात्री साडेसात वाजता झाला, तर वेळे येथील अपघात मंगळवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. जोशीविहीर येथील अपघातातील मृताचे नाव योगेश पांडुरंग जगताप (वय 48, रा. जगतापवाडी, सोनके, ता. कोरेगाव) असे आहे, तर वेळे येथील अपघातातील मृताचे नाव शाम धनंजय वाईकर (रा. शिरगाव, ता. वाई) असे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोशीविहीर येथील उड्डाणपुलावर बंगळूरकडे जाणारा मालट्रक नादुरुस्त झाल्याने तिसऱ्या लेनवर उभा होता. योगेश पांडुरंग जगताप हे सोनके येथून सोळशी, वेळे, कवठे मार्गे भुईंजला येत होते. कवठे येथे सात वाजता त्यांचा पत्नीशी मोबाईलवरून संपर्क झाला होता. यानंतर काही वेळातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. समोर उभ्या असलेल्या मालट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. दुचाकी ट्रकवर आदळल्याने दुचाकी व योगेश जगताप मधल्यामध्ये लेनमध्ये पडले. त्यावेळी मागून येणारे अज्ञात वाहन त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेसात वाजता वेळे गावच्या हद्दीत महामार्गावर एका हॉटेलसमोर पिकअप टेम्पोला दुचाकी पाठीमागून धडकल्याने शिरगाव (ता. वाई) येथील दुचाकीस्वार ठार झाला, तर एकजण जखमी झाला आहे. शाम धनंजय वाईकर (वय 21) असे मृताचे नाव आहे. तर आकाश अशोक भोसले (वय 26, दोघे रा. शिरगाव, ता. वाई) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी महिंद्रा पिकअपचा चालक प्रवीण तानाजी धुमाळ (वय 27) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दोन्ही अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत.








