मुप्पीनकाडसिद्धेश्वर स्वामीजी बचावले
महामार्गावर बेन्नाळीनजीक अपघात, आंदोलनासाठी बेळगावला येताना दुर्घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळी पुलाजवळ शनिवारी सकाळी शिवापूर येथील मुप्पीनकाडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर स्वामीजी मात्र विस्मयकारकरित्या बचावले. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. धर्मांतर बंदी कायदा मागे घेतल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात भाग घेण्यासाठी ते बेळगावला येत होते. यावेळी हा अपघात घडला.

हत्तरगीहून बेळगावकडे येणाऱ्या कँटरने स्वामीजींच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्याचवेळी समोरून जाणारा ट्रकही अचानक थांबल्याने या दोन अवजड वाहनांमध्ये स्वामीजींची कार चिरडली गेली. शनिवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, काकतीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मारुती-800 चा चालक पंचाक्षरी बसय्या हिरेमठ (वय 26) रा. परकनट्टी, ता. हुक्केरी, पांडुरंग मारुती जाधव (वय 75) रा. बाचली, ता. करवीर, जि. कोल्हापूर अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. मुप्पीनकाडसिद्धेश्वर स्वामीजी (वय 48) रा. नवे इदलहोंड हे जखमी झाले असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पंचाक्षरी हा तरुण कार चालवत होता. तर चालकाच्या बाजूला स्वामीजी बसले होते. पाठीमागे पांडुरंग हे वृद्ध बसले होते.
या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. स्वामीजी चेपलेल्या कारमध्ये अडकून पडले होते. नागरिकांनी त्यांना त्यामधून सुखरूप बाहेर काढले. कारची झालेली अवस्था पाहता या अपघातातून स्वामीजी दैवी कृपेनेच बचावल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अपघातानंतर समोरच्या ट्रकचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे. तर कारला पाठीमागून धडक देणारा कँटर जाग्यावरच सोडून त्याही चालकाने पलायन केले आहे.
या अपघातानंतर महामार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. एकीकडे महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्याचठिकाणी घडलेल्या अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली. एम. एच. 04, केयु 5545 क्रमांकाचा कँटर ताब्यात घेण्यात आला असून कँटरचालकाचा शोध घेण्यात येत आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
केवळ दैव बलवत्तर…
अपघातात दोन वाहनांच्यामध्ये चिरडलेल्या कारची अवस्था इतकी बिकट झाली होती की तिचे केवळ तुकडेच शिल्लक राहिले होते. अशाही परिस्थितीत स्वामीजी सहीसलामत बचावल्याने पोलीस अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. कारच्या लोखंडी साठ्यात अडकलेल्या स्वामीजींना बाहेर काढतानाचा 52 सेकंदांचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.









