शिरवळ :
खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदेवाडी–भोर रस्त्यावर एकमेकांना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार होळ (ता. बारामती) येथील तीन युवक शिंदेवाडीवरून बारामतीकडे जात असताना समोरून आलेल्या दुचाकीची समोरसमोर धडक झाल्यामुळे नजीर जावेद पठाण (वय 18 रा. होळ साळोबा वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) व सचिन बळीराम मडावी (वय-22 रा.कुरडी, जि– गडचिरोली) यांचा अपघातात मृत्यू झाला तर विश्वजीत विठ्ठल खोमणे (वय 19 रा. मुरूम, ता.बारामती), वैभव नितीन भिसे (वय 19 रा. मोहोळ, ता. बारामती) व अमोल नामदेव लिगसे (वय 20 रा. लक्ष्मीनगर, जालना) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. शिंदेवाडी फाटावरून बारामतीकडे येत असताना हा अपघात झाला असून जखमींवर शिरवळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाला असून पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.








