सांगली :
भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास सांगली आष्टा रस्त्यावर तुंग गावानजीक असणाऱ्या मिंचे मळा परिसरात घडली.
सुनीता रविंद्र परीट (वय ३५, रा. बालाजी मंदिरानजीक, मिरज) आणि संजय गोपाळ धुमाळ (वय ५६, रा. म्हैसाळ वेस, मिरज) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
सदर घटनेची माहिती अशी, मयत संजय धुमाळ आणि सुनीता परीट हे दोघे दुचाकीवरुन (क्र. एमएच १० बीडब्लू ०२६०) वरुन आष्टाकडून सांगलीकडे निघाले होते. मिंचे मळ्यानजीक ते आले असता पाठीमागून वेगाने येणाऱ्या चारचाकीने (क्र. एमएच ०१ बीजी १९८०) त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकीवरील सुनीता रविंद्र परीट व संजय गोपाळ धुमाळ हे दोघेही रस्त्यावर जोरात फेकले गेले. या अपघातात दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
नागरिकांनी तातडीने दुचाकीवरील दोघाही जखमींना सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सुनीता रविंद्र परीट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर संजय गोपाळ धुमाळ यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यत सदर अपघाताचा गुन्हा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरु होते.








