जोयडानजीक अपघात
वार्ताहर /रामनगर
बेळगाव-कारवार मार्गावरील जोयडानजीक असणाऱ्या गुदरे क्रॉस येथे करंजे येथून जोयडा येथे प्रवासी घेऊन जाणारा पिकअप उलटून दोन ठार तर 11 जण जखमी झाले. अपघातात मृत झालेल्यांची नावे दयानंद आचारी (वय 52, रा. कुंभारवाडा) व दयानंद देसाई (वय 40, रा. करंजे) अशी आहेत. सदर पिकअप क्रमांक ख्A 25 झ् 4147 कुंभारवाडा ते जोयडादरम्यान असणाऱ्या गुदरे क्रॉसनजीक उलटला. गंभीर जखमी असलेल्या दयानंद आचारी यांना जोयडा सरकारी हॉस्पिटलला घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला. तर दयानंद देसाई यांना जोयडा येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जोयडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रशेखर हरिहर यांनी घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.









