अथणीत स्कूलबस-आयशर यांच्यात धडक ः दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार
वार्ताहर/ अथणी
सांगली-विजापूर राज्यमार्गावर अथणी शहरानजीक खासगी स्कूल बस आणि आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार तर 39 विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमधील दोन विद्यार्थिनी आणि एक शिक्षिका गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रघुनाथ अवताडे (वय 43, कोडगान्नूर, ता. अथणी) व मलिकसाहेब मुजावर (वय 23, रा. कलमडी, ता. तिकोटा, जि. विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात स्कूल बस आणि आयशर चालक दोघेही जागीच ठार झाले. सदर अपघात शनिवारी सकाळी 7.45 च्या सुमारास झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बनजवाड पीयु कॉलेज हे अथणी शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर सदर कॉलेजचे वसतिगृह अथणी शहरात आहे. दररोज वसतिगृह ते कॉलेज प्रवासासाठी स्कूल बसची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी वसतिगृहातून विद्यार्थिनी व शिक्षिका असे 74 जण बसमधून कॉलेजकडे जात होते. कॉलेज अवघे 200 मीटर अंतरावर असताना सांगली-मिरज मार्गावर स्कूलबस व आयशरमध्ये भीषण अपघात झाला. सदर आयशर हा कागवाड मार्गावरुन अथणीकडे येत होता.
अपघातात स्कूलबस चालक रघुनाथ अवताडे व आयशर चालक मलिकसाहेब मुजावर हे दोघेही जागीच ठार झाले. रघुनाथ अवताडे हे सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झाले होते. तर बसमधील 39 विद्यार्थिनी जखमी झाल्या. सदर विद्यार्थिनी अथणी तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील आहेत. अपघातानंतर आरडोओरड सुरू झाल्यानंतर नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तत्काळ 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. बसमधून जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हा पोलीसप्रमुखांसह अधिकाऱयांच्या भेटी
आयशर वाहन हे कागवाडहून अथणीकडे पीव्हीसी पाईप घेऊन येत होते. या अपघातात स्कूल बस व आयशर वाहनाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रांताधिकारी संतोष कामगौडा, तहसीलदार सुरेश मुंजे यांनीही रुग्णालयांना भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करताना पालकांना धीर दिला. याबरोबरच युवा नेता चिदानंद सवदी, काँग्रेसचे गजानन मंगसुळी, माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी भेटही देऊन विचारपूस केली.
सदर अपघातात दोन विद्यार्थिंनी व एक शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर अथणी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य 36 जण जखमी असलेल्यांवर अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी धावपळ, धाकधूक
स्कूल बसला शहराबाहेर मोठा अपघात झाल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरताच पालक, विद्यार्थ्यांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेताना मोठी गर्दी केली होती. यावेळी जखमींची आरडोओरड, रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज, जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी चाललेली धावपळ, जखमींच्या नातेवाईकांकडून आपल्या पाल्याची सुरू असलेली चौकशी यामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण पसरले होते. यावेळी पोलिसांनी आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे जखमींना वेळेत रुग्णालयात पोहचविण्यात यश मिळाले.
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक नियमबाहय़
आरटीओ अथणी एस. बी. तीर्थ यांच्याशी संपर्क साधला असता परिवहन खात्याच्या नियमानुसार बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेणे चुकीचे आहे. याबाबत नोटीस दिली होती. असे असतानाही अनेक शाळा स्कूल बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करतात. असे प्रकार नियमबाहय़ आहेत. यामुळे शाळांनी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा त्यांनी इशारा दिला.
अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प
सकाळी 7.45 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानंतर सुमारे 2 तास सांगली-विजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. यावेळी जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी 6 रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. तर मदतीसाठी परिसरातील नागरिकही मोठय़ा संख्येने एकत्र आल्याने मोठी गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, जखमींना पाठवून दिल्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरू करण्यात आली.









