गिअर बदलताना बस झाली रिव्हर्स, अपघाताला चालक कारणीभूत
बेळगाव : हुबळीहून पुण्याकडे जाणारी खासगी आराम बस पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ ब्रिजवरून खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 प्रवासी जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. बुधवार दि. 27 रोजी रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून हिना सलीम शेख मुल्ला (वय 31) मूळची राहणार गदग, सध्या राहणार सारसबाग, यासिनजक्क दर्गा पुणे, प्रशांत मडिवाळ (वय 32) राहणार बंडीवाड, ता. हुबळी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.
एस. आर. श्रेया राहणार हरिहर, जि. दावणगेरे, श्रद्धा राजेंद्र मेहेरवाडे राहणार हुबळी, संजना शिवरुद्रप्पा पट्टण राहणार धारवाड, आदिनारायण वेंकटसुब्बय्या मेरम राहणार पुणे, ऋषिकेश कामत उरणकर राहणार बेंगळूर, सूरजसिंग बाळासिंग रजपूत राहणार सौंदत्ती, ताकीरअहमद जैलानी सुदरजी राहणार अळणावर, अब्दुलमोहीद जाकीरहुसेन मुजावर राहणार अळणावर, मोहम्मदउमर मोहम्मदइद्रिस मुल्ला राहणार हुबळी रोड, गदग, नितीन रावसाहेब माने राहणार निपाणी व गौडा अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी बसचालक नितीन रावसाहेब माने (वय 28) राहणार शाहूनगर, बुदलमुख, ता. निपाणी याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री एनएल 01 बी 3647 क्रमांकाची खासगी आराम बस हुबळीहून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ ब्रिजजवळ चढतीला बस आल्यानंतर चालकाने बसचा गिअर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी बस रिव्हर्स आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस सरळ ब्रिजवरून खाली कोसळली.
रात्री 10.30 च्या दरम्यान हा अपघात घडला. त्यावेळी पाऊसदेखील सुरू होता. त्यामुळे बराच उशीर अपघात घडल्याचे निदर्शनास आले नाही. ही माहिती समजल्यानंतर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेंद्र होळेन्नावर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र, घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून इस्पितळात हलविण्यात आले.
ऐन गणेशोत्सवादिवशीच हा अपघात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बडेकोळ्ळमठ घाटातील उतार धोकादायक असल्याने त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यासंदर्भात पोलीस खात्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. त्यातच चढतीला हा अपघात घडल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. सदर अपघाताला चालकाचा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बस चढतीला लागल्यानंतर गिअर बदलताना बस रिव्हर्स आल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.









