जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरू
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या संघर्षान दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेली चकमक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. गोळीबार केलेले दहशतवादी जंगलभागात पळून गेले असले तरी त्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. परिसरात दोन ते तीन दहशतवादी असण्याची शक्मयता आहे.
कोकरनागमध्ये गेल्या वर्षभरातील ही दुसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये कोकरनागच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले होते. आता नव्या घुसखोरीमध्ये दहशतवादी दोडा येथून अनंतनाग परिसरात घुसल्याचे समजते. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग शहरात दिवसभर ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू करताच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली.