2021 च्या करारानंतर पहिल्यांदाच शस्त्रसंधी भंग : जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये घडली घटना
वृत्तसंस्था/ जम्मू
भारत-पाकिस्तान सीमेवार पाक रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली असून जखमी बीएसएफ जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.
पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आल्यावर अरनिया सेक्टरमध्ये तैनात भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आहे. 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानंतर शस्त्रसंधी उल्लंघनाची ही पहिलीच घटना आहे.
बीएसएफचे दोन जवान खांबांवर चढून बल्ब बदलत असताना पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केल्याची माहिती देण्यात आली आहे. हा भाग सीमेपासून सुमारे 600 मीटर तर सीमा चौकीपासून सुमारे 1500 मीटर अंतरावर आहे. भारत आणि पाकिस्तानने 25 फेब्रुवारी 2021 रोजी शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केली होती. जम्मू-काश्मीर आणि अन्य क्षेत्रांमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे कठोरपणे पालन करण्याची घोषणा दोन्ही देशांनी केली होती.
भारत आणि पाकिस्तानने यापूर्वी 2003 मध्ये शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केली होती, परंतु पाकिस्तान सातत्याने या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे. 2020 मध्ये 5 हजारांपेक्षा अधिकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. हे प्रमाण कुठल्याही वर्षातील सर्वाधिक ठरले होते.
2021 मध्ये शस्त्रसंधीची घोषणा होण्यापूर्वी पाकिस्तानने नियंत्रण रेषा तसेच आंतरराष्ट्रीय सीमेला लक्ष्य करत गोळीबार केला होता. या गोळीबारात भारताच्या सीमावर्ती क्षेत्रांमधील शाळा, आरोग्य केंद्रे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाले होते.
2018, 2019 आणि 2020 मध्ये पाकिस्ताने एकूण 10,572 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते, पाकिस्तानच्या गोळीबारात 364 जवान आणि 341 नागरिक जखमी झाले होते अशी महिती फेब्रुवारी 2021 मध्ये लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल केंद्र सरकारकडून देण्यात आली होती.
भारत-पाकिस्तानदरम्यना 3,323 किलोमीटर लांबीची सीमा असून यातील 221 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमा आणि 740 किलोमीटर लांब नियंत्रण रेषा असून ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे.









