पुणे / प्रतिनिधी :
पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
रवी सिंग तेजपाल सिंग लुभाना (वय-२७, मूळ रा. मयूर विहार फेज १, न्यू दिल्ली, सध्या सानपाडा रेल्वे स्थानक परिसर) आणि शिवकुमार रेटामल्लाई (वय -५१, रा. मिल कॉलनी, रामजी नगर, तिरुचेरापल्ली, तामिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मागच्या काही दिवसात पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडाळा, जाबरुख, पळसधरी येथे जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. यासाठी लोहमार्ग पुणेच्या गुन्हे शाखेच्या एका पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या तपास पथकाने मागच्या दोन महिन्यात झालेल्या जबरी चोरीचा अभ्यास करून तुर्भे रेल्वे स्थानकावरून रवी सिंग लुभाना याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने रेल्वेच्या खिडकीतून हात घालून लोणावळा, खंडाळा, जामरूख रेल्वे स्थानक येथे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या बॅग, गळ्यातील मंगळसुत्र चोरले असल्याचे कबुल केले. त्याच्याकडून नवी मुंबई येथून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
तर पुणे रेल्वे स्थानक येथून रात्रीच्या वेळी लॅपटॉप चोरणाऱ्या शिवकुमार रेटामल्लाई याला सापळा रचून अटक केली. त्याने चोरलेले ४ महागडे लॅपटॉप तिरुचेरापल्ली, तामिळनाडू जप्त केले आहे. दोन्ही आरोपींकडून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.









