वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या जहांगिरपुरी भागात दिवसाढवळय़ा एका अल्पवयीन व्यक्तीने गोळीबार केल्यामुळे मोठाच गोंधळ उडाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित होत असून तो असंख्यांनी पाहिला आहे. या अल्पवयीन व्यक्तीने जावेद नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला होता. या प्रकरणी सर्व संशयितांना अटक करण्यात आली.
7 महिन्यांपूर्वी जावेद नामक व्यक्तीने या अल्पवयीन व्यक्तीच्या वडिलांना मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी या अल्पवयीनाने आपल्या काही साथीदारांसह जावेदवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपींविरोधात भारतीय दंडविधान अनुच्छेद 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जावेद जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.









