जांबोटी-खानापूर मार्गावरील ओलमणीनजीक दुर्घटना
वार्ताहर/जांबोटी
भरधाव मिनी बस नाल्यात उलटून दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर ओलमणी गावानजीक घडली. सध्या जांबोटी-कणकुंबी भागात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य पाहणे तसेच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. बुधवारी सकाळी सुळेभावी ता. बेळगाव येथून सुमारे वीस ते पंचवीस युवक, युवती पर्यटनासाठी मिनी बस क्रमांक के. ए-19 बी. 6016 मधून बेळगाव-खानापूर जांबोटीमार्गे प्रवास करीत असताना जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर ओलमणी गावानजीक असलेल्या नाल्यावरील एका अरुंद पुलावर जांबोटीहून खानापूरकडे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला साईड देताना, मिनी बसचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पुलाचा कठडा तोडून नाल्यात पलटी झाली.
सदर मिनी बस झाडाला अडकल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातात एक युवक व एक युवती किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मिनी बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जांबोटी पोलीस आऊट पोस्टचे साहाय्यक उपनिरीक्षक एन. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. सध्या कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे बेळगाव-जांबोटी-गोवा ही वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहनधारक पर्यायी मार्ग म्हणून बेळगाव-खानापूर, जांबोटी-गोवा असा प्रवास करीत असल्यामुळे जांबोटी-खानापूर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.









