सोनी :
भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फिनेल सदृश रासायनिक केमिकल अंगावर उडाल्यामुळे प्रयोगशाळा कर्मचाऱ्यासह एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. दरम्यान केमिकल अंगावर उडाल्याच्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा संघटनेच्यावतीने निषेय व्यक्त करण्यात आला आहे.
भोसे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये मंगळवारी प्रयोगशाळेत वापरासाठी फिनेल सदृश द्रावण सौम्य करण्यासाठी त्या द्रावणाचा कॅन उघडताना, सदरचे तीव्र दर्जाचे द्रावण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. राजश्री सुभाष चौगुले यांच्या तोंड, डोळे आणि हातावर उडाल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
त्याचवेळी त्यांच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याची लहान मुलगी जखमी झाली. सदरची घटना घडल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांना १०८ अॅम्बुलन्समधून मिरज सिव्हील हॉस्पिटल दाखल केले. दोन्ही जखमींवर मिरज़ सिव्हिलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.
दरम्यान या घटनेनंतर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्राथमिक स्तरावर १०० दिवस क्षयरुग्ण शोधमोहिम, कुष्ठरोग शोधमोहिम, शासकिय कर्मचारी आरोग्य तपासणी, राजारामबापू पाटील आरोग्य शिबीर, इत्यादी योजना सुरु आहेत.
खरेतर ज्या-त्या विभागाने लागणाऱ्या रासायनिक व इतर साहित्य सामुग्री देणे आवश्यक आहे परंतु असे न होता वरिष्ठाच्या दौऱ्यावेळी सर्व गोष्टींची पूर्तता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी पूर्ण करण्याचा तगादा लावला जात आहे.
वरील बाबींचा विचार करुन साहित्य पुरवावे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना नेमणुकीचे ठिकाण सोडून इतर केंद्राकडील बंधनकारक प्राथमिक आरोग्य कामकाज करणे केले जाते. यामध्ये स्पूटम, हिवतापसारख्या आजारांचे निदान घाई गडबडीत करणे शक्य होत नाही. याचा ताण वैज्ञानिक अधिकाऱ्यांवर येतो तरी तो त्वरीत बंद करावा.
जागतिक आरोग्य संघटनेकडून क्षयरोग हा गंभीर आजार म्हणून घोषीत केला असतानाही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याला , स्वः सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य दिले जात नाही. उलट क्षयरोगाचे काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला जोखीम भत्ता दिला जातो. परंतु स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनाही जोखीम भत्ता मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या
- राजश्री चौगुले यांची दुखापत गंभीर
प्रयोगशाळेमध्ये काम करताना चेहरा तोंड हात आणि अंगावर उडालेले केमिकल मुळे राजश्री चौगुले यांना खोलवर दुखापत झाली असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डोळ्यावर देखील केमिकल उडाल्यामुळे डोळ्याला दुखापत झाली आहे.








