पाकिस्तानच्या कारनाम्याचा पर्दाफाश
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईत पुंछमध्ये सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानचा उल्लेख असलेले काही दस्तावेजही हस्तगत करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर अधिक सुरक्षा वाढवण्यात आली होती.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने परिसरात शोधमोहीम राबवली होती. या शोध मोहिमेदरम्यान घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांशी लष्कराची चकमक झाली. चकमकीअंती मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यानंतर संयुक्त कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. यापूर्वी 23 जून रोजी मोठे यश मिळवताना कुपवाडा येथे लष्कराने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याशिवाय 16 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातच 5 दहशतवादी मारले गेले होते.









