वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले भारताचे दोन धावपटू प्रधान किरुलकर आणि विवेक मोरे हे उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर अनुक्रमे 3 आणि 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. सदर माहिती एआययुच्या प्रवक्त्याने दिली आहे.
पुणे हाफ मॅरेथॉन 15 डिसेंबर रोजी आयोजित केली होती. या मॅरेथॉनवेळी काही धावपटूंची अचानक उत्तेजक चाचणी घेण्यात आली. भारतीय अॅथलेटिक क्षेत्रामध्येही आता उत्तेजक द्रव घेणाऱ्या खेळाडूंची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येते. याच मॅरेथॉनवेळी भारताची अर्चना जाधव हिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. तिच्या मुत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याने तिच्यावरही चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. प्रधान किरुलकरच्या मुत्रल चाचणी नमुन्यात निर्बंध घातलेले मेलडोनियम हे द्रव आढळल्याचे सांगण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोग शाळेत यांची तपासणी करण्यात आली.









