दुचाकीवरून आलेल्या भामट्यांचे कृत्य
बेळगाव : चेन स्नॅचिंगच्या दोन घटनांनी शाहूनगर परिसरात खळबळ माजली आहे. शुक्रवारी सायंकाळी या घटना घडल्या असून रात्रीपर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले नव्हते. पोलीस अधिकारी मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या कामात गुंतले होते. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले आहेत. याठिकाणाहून काही अंतरावर आणखी एका महिलेच्या गळ्यातील दागिने पळविण्यात आले आहेत. घटनांची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने वृद्धेला धक्का बसला आहे. त्यामुळे शनिवारी वृद्धेकडून माहिती घेऊन एफआयआर दाखल करण्यात येणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ काही मिनिटांच्या अंतरावर घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या दोन घटनांनी खळबळ माजली असून भामटे केटीएम दुचाकीवरून आले होते, अशी माहिती मिळाली आहे. एफआयआर दाखल झाल्यावरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.









