वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर असले तरी दोन्ही आरोपी 2018 पासून तुरुगात असल्यामुळे त्यांना अटी-शर्थींवर तात्पुरता दिलासा देण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
2018 च्या भीमा-कोरेगाव प्रकरणात वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या दोघांवर गंभीर आरोप आहेत. पण ते पाच वर्षांपासून कोठडीत असल्यामुळेच त्यांना जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी वर्नन गोन्साल्विस आणि अऊण फरेरा यांना काही अटी घालण्यात आल्या असून दोघांचे पासपोर्ट जप्त करण्यात येणार आहेत. तसेच जामिनाच्या कालावधीत त्यांना एनआयए अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
वर्नन गोन्साल्विस आणि अरु ण फरेरा यांना जामिनावर असताना महाराष्ट्राबाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच खंडपीठाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक मोबाईल वापरण्याचे आणि त्यातील लोकेशन सतत ऑन ठेवण्याचे निर्देशही न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने दिले आहेत. जामिनावर असताना आपण कोणत्या ठिकाणी राहणार आहोत, याची पूर्ण माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) देतानाच वास्तव्याचा पत्ता कळवण्याची सूचनाही केली आहे.









