20 हजार रु. हस्तगत : नऊ महिन्यांपूर्वी मारले होते पाकीट
बेळगाव : शिवबसवनगर येथील केपीटीसीएल हॉलमध्ये पाकिटमारी करणाऱ्या हुबळी येथील दोघा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 20 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. राजू मारुती गुरव, राहणार देवराज अरस कॉलनी, बसवणकुडची यांच्या पँटचा डावा खिसा कापून रोकड पळविण्यात आली होती. 5 ऑक्टोबर 2024 रोजी ही घटना घडली होती. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. शिवाजी रामू मुळगुंद (वय 37), श्रीनिवास मल्लाप्पा रामगिरी (वय 40) दोघेही राहणार गंगाधरनगर, सेटलमेंट एरिया, दुसरा क्रॉस, हुबळी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, उदय पाटील, पी. एम. मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोघा जणांना अटक करून 20 हजार रुपये जप्त केले आहेत.









