शहराच्या मध्यवर्ती भागातील घटनेने भीती
बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भोवी गल्लीतील बंद असलेल्या दोन घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. आणखी एक घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, कडीकोयंडा तोडता आला नसल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. चोरांची छबी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भोवी गल्ली येथील गणेश सतीश भंडारी यांचे घर फोडून घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी आणि रोख रक्कम 14 हजार रुपये चोरट्यांनी लांबविली. तर विशाल जयवंत कित्तूर यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून देवाऱ्यावरील देवीचा मुकूट, चांदीचे दोन हात आणि चेन लांबविली आहे. प्रतीक राजेंद्र चव्हाण यांचे घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला.
सतत गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गल्लीतील दोन घरे फोडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी प्रथम प्रतीक यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी विशाल कित्तूर यांचे घर फोडून ऐवज लांबविला. त्यानंतर गणेश भंडारी यांच्या घराची कडी तोडून कपाटातील किमती ऐवज आणि रोख रक्कम लांबविली आहे. याबाबत मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती.









