वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी भागात चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पारवाड गावातील दोन घरे कोसळून दोन्ही कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. पारवाड येथील महादेव विष्णू गावडे आणि श्रीकांत महादेव गावडे यांची घरे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळली असून या दोन्ही कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेचे माहिती मिळताच पारवाड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून दोन्ही कुटुंबांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले असून तलाठी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिलेली आहे. लवकरात लवकर योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पारवाड ग्रा.पं.अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी केली आहे.









