वार्ताहर /किणये
तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रविवारी हलगा गावातील दोन घरे कोसळली. यामुळे सदर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात राहती घरे व भिंती कोसळल्यामुळे त्या कुटुंबीयांनी राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लक्ष्मी गल्लीतील रुक्मिणी भैरू बिळगोजी यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली तसेच घराचा काही भागही कोसळला आहे. घर कोसळल्याने जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच बाहुबली देसाई यांचेही घर कोसळले आहे. घर कोसळताना आवाज आल्यामुळे घरातील सदस्य बाहेर आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ग्रामपंचायतीचे काही सदस्य व गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. या दोन्ही कुटुंबीयांना प्रशासनातर्फे मदत करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हलगा गावचे तलाठी प्रदीप निलजी, पीडिओ विजयलक्ष्मी तग्गी, सेक्रेटरी जोसूप फर्नांडिस, ग्रामपंचायत अध्यक्ष सागर कामाण्णाचे, माजी अध्यक्ष गणपत मारिहाळकर व सदानंद बिळगोजी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.









