प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील गर्लगुंजी येथील बंद असलेल्या घरात रविवारी रात्री धाडसी चोरी झाली आहे. सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरटय़ांनी लंपास केली आहे. ग्रामीण भागात चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, रेश्मा नारायण गोजेकर या आपल्या नातेवाईकांकडे गोव्याला गेलेल्या होत्या. हे घर बंद असलेले पाहून शेजारील घरांना बाहेरून कडी घालून चोरटय़ांनी रेश्मा गोजेकर यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि तीस हजार रुपये रोख चोरटय़ांनी लांबविले. तर भरमाण्णा चौगुले यांच्या घरातही चोरी करण्यात आली आहे. घरातील रोख दहा हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केले आहेत. भरमाण्णा हे मजगाव येथे आसतात. हेही घर बंद होते. तर मारुती चौगुले यांच्या घरीही चोरीच्या प्रयत्नात होते. मात्र शेजारील लोकांनी आरडाओरड केल्याने चोरटय़ांनी पलायन केले. या दोन्ही चोरीच्या घटना रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले. दोन्ही गुन्हय़ांची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक जालीहाळ पुढील तपास करीत आहेत.