दोन लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई : रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक
प्रतिनिधी/सांगली
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतनगर येथील आठ महिन्यापूर्वी बंद फ्लॅट फोडणारा आणि 15 दिवसापूर्वी अभयनगर येथे दिवसा एक बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव गणेश विजय डोईफोडे वय 25, रा. शिवनेरीनगर कुपवाड, ता. मिरज. जि. सांगली आहे. त्याच्याकडून एकूण दोन लाख 29 हजार 600 रूपयांचा चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात आणि जिल्हय़ात मोठयाप्रमाणात घरफोडी करण्यात येत आहे. या घरफोडी करणाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष स्थानिक गुन्हा अन्वेषणकडून ठेवण्यात आले होते. यामध्येच हे पथक चिन्मय पार्क येथे थांबले असताना त्याठिकाणाहून जाणाऱ्या एका संशयिताला या पथकाने ताब्यात घेतले तर हा संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश विजय डोईफोडे असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन लाख 29 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. यामध्ये सोन्याचे मंगळसुत्र, लहान मुलाच्या कानातील मुदय़ा, हातातील मनगटी, त्रिकोणी पदक असणारे सोन्याचे मंगळसुत्र, बंगाली डिझाईनचा हार, सोन्याची कर्णफुले, पैंजण आणि जोडवी असा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांने हे दागिने आणि चांदीच्या वस्तू आठ महिन्यापूर्वी वसंतनगर येथील बंद फ्लॅट फोडून आणि पंधरा दिवसापूर्वी अभयनगर येथील बंद फ्लॅट फोडून चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या पथकाने केली.








