ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार असून, या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटविण्यात येणार आहे. परिणामी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा कोसळला होता. प्रशासनाच्या वतीने हा ढिगारा हटविण्यात आला. दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. मात्र, एका लेनवरील ढिगारा हटविण्यासाठी आणि सैल झालेली दरड काढण्यासाठी दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. जुन्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे ने ही वाहतूक मार्गस्थ होईल आणि लोणावळ्याजवळ पुन्हा एक्स्प्रेस वे शी जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र, सुरळीत सुरूच राहील. याआधी या मार्गावर सोमवारी आणि गुरुवारी असेच ब्लॉक घेण्यात आले होते.








