ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवल्याच्या कारणावरुन बीडमध्ये दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. बीडच्या केज तालुक्यात रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बीडच्या धारूर पोलिसांनी 21 जणांवर गुन्हे दाखल केले असून, 16 जणांना अटक केली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात अरबाज शेख नावाच्या तरुणाने औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवला. तसेच त्याखाली किंग असा उल्लेख करत ज्यांची बराबरी केली जात नाही, त्यांची बदनामी केली जाते, असा मजकूर लिहिला. त्यावरुन रात्री दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत 16 जणांना ताब्यात घेतले. तर 21 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून, कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.








