वृत्तसंस्था/ पॅरिस (फ्रान्स)
शनिवारी येथे झालेल्या विश्वचषक स्टेज-4 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी सांघिक कंपाऊंड प्रकारात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय तिरंदाजपटूंनी या स्पर्धेत एकूण 5 पदके मिळविली.

पुरूषांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि प्रथमेश जावकर यांनी अमेरिकेच्या ख्रिस स्केफ, जेम्स लूझ आणि सुलीव्हान यांचा 236-232 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या ज्योती सुरेखा वेनाम, आदिती स्वामी आणि परमित कौर यांनी मेक्सिकोच्या तिरंदाजपटूंचा केवळ एका गुणाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अलिकडे भारतीय महिला तिरंदाज संघाने कंपाऊंड या प्रकारात बर्लिनमध्ये झालेल्या स्पर्धेत विश्व चॅम्पियन्सचा बहुमान मिळविला होता. महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेनामने कास्यपदक मिळविले. भारताला या स्पर्धेत मिळालेले हे पाचवे पदक आहे. ज्योती वेनामने कोलंबियाच्या लोपाझचा टायब्रेकरमध्ये पराभव केला. या स्पर्धेत पुरूषांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताने उपांत्य लढतीत कोरियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या तिरंदाजपटूंनी रिकर्व्ह सांघिक प्रकारात दोन कास्यपदके मिळविली आहेत. भारताच्या महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाज संघामध्ये भजन कौर, अंकिता भक्त आणि सिमरनगीत कौर यांचा समावेश आहे.









