वृत्तसंस्था/ जकार्ता
येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट कायम राखली आहे. सोमवारी या स्पर्धेत भारताचा नेमबाज योगेश सिंगने पुरूषांच्या 25 मी. सेंटर फायर पिस्तुल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात 2 सुवर्णपदके पटकाविली.
पुरूषांच्या 25 मी. सेंटर फायर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीमध्ये योगेश सिंगने 573 गुणासह सुवर्णपदक तर ओमानच्या मुवादअली बालुशीने 570 गुणासह रौप्य आणि इंडोनेशियाच्या युलीयांतोने 567 गुणांसह कांस्यपदक घेतले. या क्रीडाप्रकारात आम्ही सहभागी झालेले भारताचे आणखी दोन नेमबाज पंकज जाधव आणि अक्षय जैन यांना अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरूषांच्या 25 मी. सेंटर फायर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताने 1704 गुणासह सुवर्णपदक तर ओमानने रौप्य आणि इंडोनेशियाने कांस्यपदक घेतले. भारतीय संघामध्ये योगेश सिंगचा समावेश होता. महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत चीन तैपेईच्या वेन लियुने सुवर्णपदक, चीनच्या झेंगने रौप्यपदक आणि कझाकस्तानच्या मारिया डिमिट्रीयांकोने कांस्यपदक घेतले. महिलांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजी प्रकारात भारतीय महिला नेमबाजांनी 328 गुणांसह रौप्यपदक मिळविले. या प्रकारामध्ये चीनने सुवर्ण तर कझाकस्तानने कांस्यपदक घेतले. श्रेयासी, मनिषा कीर आणि भव्या त्रिपाठी यांनी या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.