वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स : आशी चोक्सीला रौप्य, महिलांना सांघिक प्रकारातही सुवर्ण
वृत्तसंस्था/ चेंगडू, चीन
येथे सुरू असलेल्या एफआयएसयू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताच्या नेमबाजांनी एकूण चार पदके पटकावली. त्यात दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाचा समावेश आहे. सिफ्ट कौर सामराने दोन सुवर्णपदके मिळविली.
21 वर्षीय सामराने याआधी आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण मिळविले होते. येथे तिने महिलांच्या 50 मी. 3 पोझिशन्स अंतिम लढतीत आपल्याच देशाच्या आशी चोक्सीचा पराभव करून सुवर्ण मिळविताना 462.9 गुण नोंदवले. चोक्सीने 461.6 गुण नोंदवत रौप्य तर चीनच्या झेरु वांगने कांस्य मिळविताना 451.1 गुण नोंदवले. मानिनी कौशिकही अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. पण ती बाहेर पडली.

मात्र सिफ्ट कौर, आशी चोक्सी व मानिनी कौशिक यांनी महिलांच्या 50 मी. 3 पी सांघिक नेमबाजीत एकूण 3527 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. चीनच्या नेमबाजांनी 3524 गुण नोंदवत रौप्य व 3501 गुण घेत झेक प्रजासत्ताकने कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात वरुण तोमर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, पण अखेर त्याला 136.2 गुणांसह सातवे स्थान मिळाले. अर्जुन सिंग चीमा व अनमोल जैन यांना पात्रता फेरी पार करता आली नाही. याच प्रकारातील सांघिक विभागात भारतीय त्रिकुटाने 1730 गुण घेत कांस्य मिळविले. कोरिया संघाने 1742 व चीननेही 1742 गुण नोंदवले. पण कोरियाला (67) सुवर्ण व चीनला (61) रौप्य देण्यात आले.
10 मी. एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण मिळविलेल्या मनू भाकरने महिलांच्या 25 मी.पिस्तुल पात्रता फेरीत नववे स्थान मिळविल्याने ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. याशिवाय चिंकी यादव व अभिज्ञा पाटील यांनी 11 वे व 18 वे स्थान मिळविले. मंगळवारी भारताने या चार पदकांसह एकूण 21 पदके मिळविली असून त्यात 11 सुवर्ण, 4 रौप्य व 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. चीन, कोरिया व जपान यांच्यानंतर भारत पदकतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे.









