वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश शुटींग अकादमी मैदानावर झालेल्या वरिष्ठ तसेच कनिष्ठ महिलांच्या टी 5 राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत हरियाणाची महिला नेमबाज हॅजेलने दोन सुवर्णपदके मिळविली.
वरिष्ठ महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत मध्यप्रदेशच्या हॅजेलने रेल्वेच्या मेघना सजनारचा 17-15 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. तसेच कनिष्ठ महिलांच्या विभागातील 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत हॅजेलने कर्नाटकाच्या युक्ती राजेंद्रचा 17-9 असा पराभव करत दुसरे सुवर्णपदक मिळविले. मात्र महिला युवा विभागातील हॅजेलचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. हरियाणाच्या नॅन्सीने हॅजेलचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल टी 5 नेमबाजी प्रकारात उत्तर प्रदेशच्या उज्ज्वल मलिकने हरियाणाच्या सम्राट राणाचा 16-2 असा पराभव करत प्रथम स्थान मिळविले. सम्राटने कनिष्ठ पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविताना उत्तर प्रदेशच्या सागर डांगीचा 16-14 असा पराभव केला. पुरुषांच्या युवा विभागात हरियाणाच्या जतीन कुमारने 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविताना सेनादलाच्या पी. सिंगचा 16-6 असा पराभव केला.









