सरूड / वार्ताहर :
वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील सर्जेराव बापू खवरे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये असणाऱ्या दोन शेळ्या व एक बोकड रविवारी पहाटे बिबट्याने पुन्हा एकदा फस्त केला. यामध्ये खवरे कुटुंबाचे सुमारे तीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती स्थळावरून मिळाली. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविली आहे.
वारणा कापशी गावच्या दक्षिण दिशेला कुंभार टेकी म्हणून परिचित असलेल्या परिसरामध्ये खवरे यांचे जनावरांचे शेड आहे .पहाटेच्या सुमारास या परिसरात असलेल्या बिबट्याने शेड मधील दोन शेळ्या व एक बोकड यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. सकाळी जनावरांच्या शेडकडे गेल्याच्या नंतर सदरची घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. यापूर्वी शिवारे, लगारेवाडी परिसरात देखील बिबट्याने पाळीव शेळ्यांच्या वरती हल्ला केला आहे. परिणामी वारणा कापशीसह शिवारे, शिंपे, सरूड, माणगाव, हारुगडेवाडी परिसरातील नागरिकांच्या मधून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
बिबटयाला बंदीस्त करण्यासाठी प्रयत्नशील
कापशीयेथील पोलीस पाटील संजय लुगडे यांनी सदरची घटना वनविभागाला कळवली आहे. परिमंडळ वनाधिकारी एन.ए. नायकवडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या आठवडाभर आम्ही सदर बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु मादी बिबटयासह दोन बछडे देखील असल्याने सर्वाना पकडणे गरजेचे आहे. लोकांनी खबरदारी म्हणून सुरक्षितता बाळगावी व वन्यप्राणी आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन केले. सदर घटनेचा पंचनामा करून योग्य आर्थिक भरपाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा : ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण









