35 प्रवासी जखमी : बसची दुभाजकाला धडक : हावेरी जिल्ह्यातील मोटेबेन्नूर येथे दुर्घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
समोरील कारला चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बसची दुभाजकाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील सांगली जिल्ह्यातील दोन मुले जागीच ठार तर 35 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी मोटेबेन्नूर, बॅडगी, हावेरी येथे हा अपघात घडला. यश कसबा सावंत (वय 14, रा. बस्तवडे, ता. तासगाव, सांगली) आणि अर्णवी सचिन महाडिक (वय 11, रा. नेवरी, सांगली) अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची नोंद बॅडगी पोलीस स्थानकात झाली आहे.
35 प्रवासी जखमी
यामध्ये चालक नवाज महम्मद शफी नाईकवाडी (वय 42, रा. अशोकनगर, बेळगाव), दुसरा बसचालक रहिम मुनाफ शेख (वय 42, रा. हुंचेनट्टी, बेळगाव), वाहक रवींद्र बसवणी मठपती (वय 41, रा. सोलापूर, ता. हुक्केरी), प्रवासी मयूर पाटील (वय 32, रा. जयसिंगपूर, महाराष्ट्र), सागर अंकुश सूर्यवंशी (वय 33, रा. विटा, जि. सांगली), ऐरा देशमुख (वय 7, रा. भिलवडी, महाराष्ट्र), रहिम मुनाफ शेख (वय 42, रा. हंचनकडी, महाराष्ट्र), राणी सुभाष पवार (वय 33, रा. विटा, जि. सांगली), विजय सिहन बिलगर (वय 35, रा. विटा), अभिषेक बाहुबली केनंगी (वय 21, रा. कंगवाड), दिलीप भानुदास भोसले (वय 35, रा. कडेगाव, जि. सांगली), इशिता संजय अगरवाल (वय 22, रा. कोल्हापूर), संजय जगन्नाथ मिश्रा (वय 35, रा. सांगली), सूरज बसाते (वय 24, रा. विटा), वैशाली सचिन महाडी (वय 39, रा. नेवरी, जि. सांगली), सचिन महाडी (रा. नेवरी, जि. सांगली), महम्मदशमी इकबाल अहमद कागदबार (वय 21, रा. ताजनगर, गदग), संतोष सदाशिव साळुंखे (वय 34, रा. विटा), शहाजी रामचंद्र कदम (वय 64 रा. गोटीबंदर जि. सांगली), पुष्पा कदम (वय 56 रा. कोटीबंदर जि. सांगली), आकाश लाड (वय 32 रा. कुंडेल जि. सांगली), शिवम गजली (वय 19 रा. कराड), आनंद गणपती चव्हाण (वय 61 रा. कल्लेडोन जि. सातारा), लता चव्हाण (वय 45 रा. कोलेडोन जि. सातारा), अमिता होंडेकर (वय 29 रा. मैनी जि. सातारा), रुपाली जगताप (वय 45 रा. सांगली), रविकुमार सावंत (वय 42 रा. बसतवडे जि. सांगली), साहेबराव पुडे (वय 45 रा. तामिळनाडू), धरीयप्पा पैलवान (वय 34 रा. खाटनांद्री जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. यांच्यासह अनोळखी 9 जण असे एकूण 35 जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील 36 जण पर्यटक एका अशोक लेलँड (बस क्रमांक एआर 11 ई 9231) या खासगी बसमधून सांगलीहून कोईम्बतूरला जाण्यासाठी निघाले होते. बस हावेरी जिल्ह्यातील मोटेबेन्नूर गावानजीक आल्यानंतर समोरील कारला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला. बसवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने बसचे स्टेअरिंग उजव्या बाजूला वळविल्याने समोरील आणि पाठीमागील चाकांचे व्हील दुभाजकाला घासले. त्यामुळे भरधाव बस जवळपास 50 फुटांपर्यंत घासत गेली. यात यश आणि अर्णवी दोघेजण बसखाली सापडल्याने ते जागीच ठार झाले. सकाळच्या दरम्यान अपघात घडला त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग 48 वर मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे बचावकार्य राबविण्यात अडचणी आल्या. त्यातच काहीवेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती समजताच हावेरीच्या जिल्हा पोलीस प्रमुख यशोदा वंटगुडी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण शिरकोळ यांनी भेट देऊन पाहणी केली. बॅडगी पोलिसांनी बचावकार्य राबवत पंचनामा केला. बस महामार्गावरून बाजूला करण्यासाठी सुरुवातील एका क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा काही उपयोग न झाल्याने आणखी एक क्रेन बोलाविण्यात आली. दोन क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. याप्रकरणी बसक्लीनर रविंद्र मठपती रा. सोलापूर ता. हुक्केरी जि. बेळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक नवाज नाईकवाडी (वय 42 रा. अशोकनगर बेळगाव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.









