आष्टा :
सांगली पेठ रस्त्यावर गाताडवाडी फाट्याजवळ चारचाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेले अपघातात आष्टा येथील दोघेजण ठार झाले. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नाईकबा यात्रेला जाताना काळाने दोघा भाविकांवर घाला घातला.
अनिल बापूसो सरडे (वय ४७), घनाजी शंकर यादव खुडे (वय ५५) दोघे राहणार केशवनाथ गल्ली आष्टा अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी इसमांची नावे असून या अपघाताची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.
अपघातातील मयत अनिल सरडे आणि धनाजी यादव खुडे हे दुपारी आपले काम संपवून नाईकबा यात्रेसाठी मोटरसायकल वरून चालले होते. गाताडवाडी फाट्याजवळ मोटरसायकल आणि कारचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यानंतर दोघेही रस्त्यावर पडले.
या अपघातात अनिल सरडे हे जागीच ठार झाले. तर धनाजी यादव MH12US03 18 खुडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. अपघात स्थळी आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकोंड पोलीस कर्मचाऱ्यासह तातडीने दाखल झाले. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
अनिल सरडे आणि धनाजी यादव खुडे हे सेंट्रींग कामगार होते. आष्टा येथे एका इमारतीच्या स्लॅबचे काम पूर्ण करून ते नाईकबा यात्रेसाठी मोटरसायकलवरून निघाले होते. मात्र यात्रेत पोहचण्यापूर्वीच अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने आष्टा शहरावर शोककळा पसरली. अनिल सरडे आणि धनाजी यादव खुडे यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांच्या अपघाती निधनाने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.








