सतीश पाटीलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
गौंडवाड, ता. बेळगाव येथे शनिवारी रात्री झालेला खून, जाळपोळ, दगडफेकप्रकरणी काकती पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खूनप्रकरणी सात जणांना तर जाळपोळप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
शनिवारी रात्री सतीश राजेंद्र पाटील (वय 37) या युवकाचा खून करण्यात आला होता. त्याच्या खुनानंतर गावात अशांतता निर्माण झाली. बाराहून अधिक वाहने पेटविण्यात आली. काही घरांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी धरपकड सुरूच ठेवली आहे.
सतीशची आई व बहीण विशाखापट्टणमहून बेळगावला परतल्यानंतर सायंकाळी गौंडवाड स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय व मित्रांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. ‘सतीश अमर रहें’च्या घोषणा देत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.
काकती पोलीस स्थानकात रविवारी रात्री उशिरापर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू होती. काकती पोलिसांच्या भूमिकेबद्दल गौंडवाड येथील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर गावातील अनर्थ टळला असता, अशी प्रतिक्रिया गावकऱयांनी यावेळी व्यक्त केली.
अंत्यसंस्कारावेळी अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, एसीपी एन. व्ही. बरमनी, एसीपी गणपती गुडाजी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, महांतेश बसापूर, गुरुनाथ आदींच्या नेतृत्वाखाली गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सतीशच्या घरापासून स्मशानभूमी जवळच आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पोलीस तैनात करण्यात आले होते.
खूनप्रकरणी 7 तर जाळपोळप्रकरणी 19 जणांना अटक
युवकाच्या खूनप्रकरणी 7 जणांना तर जाळपोळप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सतीश पाटील या युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून बाळू निलजकर, लखन निलजकर, सुरेखा निलजकर, संजना निलजकर, दौलत मुतगेकर, व्यंकट कुट्रे, आनंद कुट्रे या सात जणांना अटक करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर दगडफेक, जाळपोळ केल्याच्या आरोपावरून कुमाण्णा चौगुले, भैरू सांबरेकर, मारुती निलजकर, परशराम पाटील, सुधाकर काकतीकर, उमेश मुतगेकर, निंगोजी पिंगट, आनंद पिंगट, मोहन नाथ, भाऊ पाटील, शुभम काकतीकर, सूरज चौगुले, रतन काकतीकर, व्यंकटेश भोगुलकर, भारत पाटील, गणपत पिंगट, शशिकांत काकतीकर, विलास पिंगट, पुंडलिक पिंगट सर्व राहणार गौंडवाड या 19 जणांना अटक करण्यात आली आहे.









