ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Accidents on Mumbai-Pune Expressway मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाताचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. आज मध्यरात्री या महामार्गावर खालापूरजवळ दोन भीषण अपघात झाले. यामध्ये 12 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर कामोठे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओल्या रस्त्यामुळे भरधाव वेगातील बस घसरुन पलटी झाली. या अपघातात 6 जण जखमी झाले. अश्विनी पवार (वय 32), नैतिक पवार (06) दोघे रा. जोगेश्वरी, संजय माने (40) राहणार नेरूळ, अरुष हाके (10) रा. मानखुर्द, नंदा नलावडे (21) रा. दहिसर आणि ज्योती कांबळे (34) रा. भाईंदर अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्री घरोघरी जाऊन फोटो काढण्यात व्यस्त, सुप्रिया सुळेंची टीका
तर दुसरा अपघात हा इको स्पोर्ट गाडीचा झाला. या इको स्पोर्ट गाडीचा टायर फुटल्याने कारमधील 4 जण महामार्गावर उभे राहून टायर बदलत होते. गाडीमधील लोक टायर बदलण्यासाठी खाली उतरलेले असताना गस्त घालणाऱ्या होमगार्डची गाडी तिथे आली. त्या गाडीमध्येही दोनजण होते. हे दोघेही तिथे उतरले. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीतील 4 आणि दोन होमगार्ड असे सहाजण जखमी झाले. दुसऱ्या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. हा अपघात महामार्गावरील पुणे लेनवर झाला. सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.








