श्रीनगर :
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी दहशतवादी संघटनांशी संबंध बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी दोन शासकीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. ही कारवाई राज्यघटनेच्या अनुच्छेद 311 (2)(क) अंतर्गत करण्यात आली आहे. जो राज्याला राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताकरता विनाचौकशी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार प्रदान करतो. कुपवाडा येथे कार्यरत शिक्षक खुर्शीद अहमद राथर तसेच केरन येथील पशुपालन विभागतील सहाय्यक कर्मचारी सियाद अहमद खान यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दोन्ही कर्मचारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या विरोधात ठोस पुरावे जमविले आहेत. दहशतवाद्यांना मदत करणे, दहशतवादी कारवायांमध्ये सामील होणे आणि देशविरोधी घटकांसोबत संपर्क ठेवण्यासारख्या गंभीर बाबी या चौकशीत समोर आल्या आहेत.
दहशतवाद आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही कारवायांबद्दल झिरो टॉलरन्सच्या धोरणावर कायम आहोत आणि अशाप्रकरणांमुळे कुठलीही नरमाई बाळगली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.








