नागरिकांच्या मदतीने एकाला वाचविण्यात यश
फोंडा : रंगपंचमी साजरी केल्यानंतर म्हादई नदीच्या पात्रातील गांजे येथील धरणाजवळ आंघोळीसाठी गेलेल्या 8 जणांच्या गटामधील दोघाजणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश शंकरप्पा हडपड (20 रा. खडपाबांध मूळ कर्नाटक) व शरणाप्पा संगप्पा हडपड (20, रा. खडपाबांध, मूळ कर्नाटक) अशी मयत युवकांची नावे आहेत. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 मित्रांचा गट रंगपंचमी साजरी केल्यानंतर आंघोळीसाठी गांजे येथील बंध्ऱ्याजवळ दाखल झाले होते. आंघोळ करताना अचानक बुडताना काही लोकांनी त्यांना पाहिले. त्यानंतर लागलीच मदतकार्य करीत बुडणाऱ्या तिघा युवकांपैकी एकाला वाचविण्यात लोकांना यश आले. मात्र दोघेजण बुडाले. तातडीने त्याना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पिळये धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.
माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी धावले मदतीला
फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी घटनेची माहिती मिळताच तिस्क उसगांव येथील सरकारी इस्पितळात धाव घेतली. खडपाबांध येथील युवकांचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या स्थानिक नागरिकांचे प्रथम आभार मानले. आपल्या शेजारच्या प्रभागातील दोघे युवक बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना असल्याचे सांगत दु:ख व्याक्त केले.









