बंबरग्याजवळील घटनेने हळहळ : काकती पोलीस स्थानकात नोंद
बेळगाव : बंबरगाजवळ डंपर व कारची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की, डंपर व कार पूर्णपणे जळून खाक झाले तर कारमधील दोघेही जळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोहन मारुती बेळगावकर (वय 25) रा. बंबरगा व समीक्षा सागर डेळेकर (वय 12) रा. मच्छे अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवींची नावे आहेत. कंग्राळी गावातील नातेवाईकांचे लग्न आटोपून बंबरगा गावाकडे दोघेही जात होते. याचवेळी केदनूरहून भुतरामहट्टीकडे जाणाऱ्या मातीवाहू डंपरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये डिझेल टाकी फुटली. त्यानंतर अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. कारमधील या दोघांनाही बाहेर पडता आले नाही. आगीमध्ये दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. मात्र, कोणालाच काही मदत करता आली नाही. कारमधील तरुण व बालिका जळून खाक झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की साऱ्यांचाच थरकाप उडाला होता. याची माहिती काकती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काकती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.









