पुणे / वार्ताहर :
पुण्यातील एका 32 वर्षीय महिलेवर पाळत ठेवून तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेल्या तक्रारीनंतर फोटो काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत त्यांची गुप्तहेर एजन्सी असून, ते त्यांच्या ग्राहकासाठी काम करीत असल्याची बाब समोर आली आहे.
निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय 25, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (वय 30, रा. देहुगाव, ता. मावळ) अशी आरोपीची नावे आहेत. निलेश परदेशी यांची गुप्तहेर संस्था असून, बिरादार हे त्यांचे सहायक आहेत. हा प्रकार 1 डिसेबर 2022 पासून सात डिसेंबरपर्यंत सुरु होता. यादरम्यान संबंधित महिलेस आपला कोणीतरी पाठलाग करुन आक्षेपार्ह फोटो काढून ते कोणाला तरी पाठवत आहे असा संशय आला. आपले फोटो काढून कोणीतरी त्याचा गैरवापर करतील, सोशल मीडिया अथवा इतर घातपाती कृतीसाठी करण्याची शक्यता असल्याचा संशय तिला आल्याने याबाबत तिने पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार केली. परंतु तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर तिने सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकार समजावून सांगितला.
अधिक वाचा : कोचर दाम्पत्याला दिलासा; तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेवर कोण पाळत ठेवत आहे, याचा शोध घेणे सुरु केले. तक्रारदार महिला या कोरेगाव पार्कमधील ऑर्थर्स थिम हॉटेलमध्ये 7 जानेवारी रोजी गेल्या होत्या. त्यावेळी हॉटेलमध्ये दोघे जण त्यांचे लपून दूरवरून फोटो काढत होते. ही बाब तक्रारदार यांच्यावर नजर ठेवून असलेल्या साध्या वेशातील पोलिसांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते एका गुप्तचर संस्थेचे असल्याचे आढळून आले. त्यांना हे काम कोणी दिले याची माहिती ते देत नाही. त्यांनी फोटोचा वापर सोशल मिडीयावर तसेच इतर घातपाती कृतीसाठी केला आहे का याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तीगत जीवन जगण्यास अडचणी निर्माण करुन त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर पुढील तपास करीत आहेत.









