पुणे / प्रतिनिधी :
देशविरोधी कारवायांच्या संशयावरून पोलिसांनी दोघांना कोथरूडमधून ताब्यात घेण्यात आले असून, या वेळी एकजण फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांकडून काडतुसे आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून लॅपटॉपमधील माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. त्यांच्याकडून संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याने पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली आहे.
कोथरूड परिसरात वास्तव्यास असलेल्या दोन तरुणांच्या संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने नाकाबंदीदरम्यान दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. दोघांकडून काही संशयास्पद कागदपत्रे, लॅपटाॅप, मोबाइल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांचे वय २५ ते ३० वर्ष दरम्यान आहे. दोघांकडून काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडे पिस्तूल सापडले नाही. लॅपटाॅपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती एटीएसला दिल्यानंतर एटीएसकडून दोघांची मंगळवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. तीनही संशयित आरोपी कोंढवा परिसरात वास्तव्यास आहेत. ते कोथरूडमध्ये सतत ये-जा करायचे. कोथरूड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. तिसऱ्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.









