कोल्हापूर / संग्राम काटकर :
विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मानवतेच्या भावनेने आधार देण्यासाठी 63 धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिह्यात ही धर्मादाय रुग्णालये विविध ट्रस्टअंतर्गत कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून रुग्णसेवा देणारी सर्व रुग्णालये कोल्हापुरातील बागल चौकनजिकच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अखत्यारित कार्यरत आहेत. या रुग्णालयांकडून गरजूवर मोफत उपचार होत असल्याने त्याची मोठ्या रकमेच्या बिलांपासून मुक्तता होत आहे. मानवतेने उपचार केल्याचे समाधान रुग्णालये मानताहेत. रुग्णसेवाचा हा सेतू खुद्द उच्च न्यायालयानेच बांधला आहे.
धर्मादाय रुग्णालयातील मोफत रुग्णसेवा कशी चालते याबाबत कोणालाच फारशी माहिती नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात या रुग्णसेवेला प्रतिसाद हवा होता तो मिळताना दिसत नाही. ही रुग्णसेवा प्रत्यक्ष आकाराला येण्यामागे सेवानिवृत्त गिरणी कामगार गजानन पुनाळेकर यांचे योगदान आहे. त्यांनी एका रुग्णालयात उपचारांमध्ये रुग्णांना सवलत मिळते की नाही याबाबत विचारणा केली होती. परंतू समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नाराज पुनाळेकर यांचे चिरंजीव संजीव यांनी गरीब ऊग्णांना मोफत उपचार देणारी व्यवस्था रुग्णालयांमध्ये असावी असे सुचवणारी रिट याचिका उच्च न्यालालयात दाखल केली. याचिकेकडे गांभिर्याने पाहून न्यायालयाने रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या उपचार देणारी धर्मादाय रुग्णालय योजना राज्यात सुरु करण्याचा आदेश दिला.
त्यानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्गमधील सेवाभावी तत्वावर कार्यरत ट्रस्टकडील रुग्णालयांची मोट बांधली. जसजशी वर्षे पुढे सरकू लागली तशी ट्रस्टकडील रुग्णालयांना धर्मादाय रुग्णालय योजनेत सामावून घेतले. सध्याच्या घडीला 63 रुग्णालयात ज्या रुग्णांचे उत्पन्न 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत आहे, त्याच्यावर मोफत उपचार केले जातात. ज्याचे उत्पन्न 1 लाख 81 हजार पासून 3 लाख 50 हजार रुपये आहे, त्याला उपचारात 50 टक्के सवलत मिळते. गेल्या दोन दशकात हजारो रुग्णांवर मोफत व सवलतीमध्ये उपचार करुन रुग्णांच्या पैशांची बचत केली आहे. गतवर्षात सर्वच रुग्णालयांमध्ये 8 हजार 310 रुग्णांवर उपचार केले आहेत. उपचाराची व्यवस्था रुग्णालयातील रुग्ण मित्र करतात. ते रुग्णालयात कोणते उपचार होतात याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देतात. तसेच ते उपचारासाठी ठराविक बेड राखीव ठेवतात. अशी सगळी जमेची बाजू असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे प्रमाण एकदम कमी आहे. जनमाणसांनी ऊग्णालयांना भेटी देऊन तेथील माहिती घ्यावी असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने केले आहे.
ट्रस्टअंतर्गत कार्यरत असलेली कोल्हापुरातील मोठी धर्मादाय रुग्णालये : सिद्धगिरी रुग्णालय –विविध प्रकारांसह मेंदुवरही केली जाते शस्त्रक्रीया, डी. वाय. पाटील हॉस्पीटल, कोडोली (ता. पन्हाळा) येथील यशवंत रुग्णालय, गडहिंग्लजमधील केदारी रेडेकर रुग्णालय, संत गजानन रुग्णालय: सर्व आजारांवर उपचार. विविध जिह्यातील धर्मादाय रुग्णालयांची संख्या: कोल्हापूर-24, सांगली-29, रत्नागिरी-5, सिंधुदूर्ग-5
धर्मादाय रुग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या रुग्णालयांच्या वार्षिक उत्पन्नातून 2 टक्के रक्कम बाजूला ठेवली जाते. ही रक्कम रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. रुग्णालयात अॅडमिट होताना ऊग्णांला आपले रेशनकार्ड, आधारकार्ड व फोटो अशी कागदपत्रे रुग्णालयातील रुग्ण मित्राकडे द्यावी लागतात. रुग्णांवर होणाऱ्या मोफत उपचारांची माहिती रुग्ण मित्र घेत असतात. उपचारात खंड पडणार नाही याची दखल सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातून घेतली जाते.
– महादेव जावळे (निरीक्षक : धर्मादाय रग्णालय योजना)








