वृत्तसंस्था /चेन्नई
तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीमध्ये दोन दलित युवकांना निर्वस्त्र करत त्यांच्यावर लघुशंका करण्याची घटना घडली आहे. आरोपींनी प्रथम दोन्ही युवकांना जातीबद्दल विचारले, मग मारहाण करत त्यांच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपींनी दोन्ही जखमी युवकांना लुटून पळ काढला होता. दोन्ही पीडित युवक मणिमूर्तिश्वरमचे रहिवासी असून पोलिसांनी याप्रकरणी 6 आरोपींना अटक केली आहे. दोन्ही युवक नदीत पोहण्यासाठी थमिराबरानी येथे गेले होते. तेथून परतताना आरोपींनी त्यांना रोखले होते. आरोपी हे नदीच्या काठावर बसून मद्यपान करत होते. आरोपींनी पीडितांना त्यांची जात अन् घरचा पत्ता विचारला होता. पीडितांनी आपण अनुसूचित जातीशी संबंधित असल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी पीडितांचे कपडे फाडून त्यांच्या अंगावर लघुशंका केली होती. आरोपींनी पीडितांना रात्रभर ओलीस ठेवले होते. मग 5 हजार रुपये, दोन मोबाइल फोन, एटीएम कार्ड काढून घेत आरोपींनी पळ काढला होता. यानंतर जखमी अवस्थेत दोन्ही युवक नजीक राहत असलेल्या नातेवाईकाच्या घरी गेले आणि तेथून स्वत:च्या आईवडिलांशी संपर्क साधला होता. यानंतर दोघांना तिरुनेलवेली रुग्णालयात दाखल करण्यात आले.









