लातूर : चाकुचा आणि पिस्टलसदृश्य हत्याराचा धाक दाखवून लातूर शहरातील व्यापारी राजकमल अग्रवाल यांच्या शहरालगत, कातपूर रोडवर असलेल्या घरावर लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतचा सर्वात मोठा दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे अडीच कोटी रूपये रोख, एक ते दीड किलो सोनं असा ऐवज लुटन नेल्याने सबंध जिल्हाभरात उलट सुलट चर्चा चालू आहे. हा दरोडा चोरट्यांनी सिनेस्टाईल पध्दतीने घातला असल्याचे बोलले जात आहे. तसेच चोरटे हे कुख्यात दरोडेखोर असावेत असाही संशय व्यक्त केला जात आहे.
राजकमल अग्रवाल हे शहरातील मोठे व्यापारी आहेत. त्यांचे गोयल ट्रेडिंग हे फर्म आहे. त्यांच्या लातूर शहरालगत कन्हैय्या नगर/ रामचंद्र नगर, कातपूर रोड, लातूर येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. घरात घुसताच त्यांनी राजकमल अग्रवाल यांना जागं केलं, त्यांच्या गळ्याला चाकू लावला, पिस्टल सदृश्य हत्याराचा धाक दाखविला. यावेळी घरात अग्रवाल, त्यांची पत्नी, मुलगा, सून असे चौघेजण होते. त्या सर्वांना दरोडेखोरांनी धमकी दिली. त्यांच्याकडील सर्व मोबाईल काढून घेतले. दरोडेखोरांना राजकमल अग्रवाल यांच्याकडून कपाट, लॉकरच्या चाव्या घेतल्या, एखाद्या प्रशिक्षीत सराईत गुन्हेगारांप्रमाणे अगदी थंड डोक्याने दरोडेखोरांनी घरातील सोने, रोख रूपये ताब्यात घेतले. जाताना दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून व्हायफायचा बॉक्स नेला. जाताना दरोडेखोरांनी आम्ही बराच वेळ इथेच थांबणार आहोत. काही हालचाल करू नका, आरडाओरड करू नका, कोणाशी संपर्क साधू नका अशी धमकी दिली. दरोडेखोर 25 ते 30 वर्षे वयोगटातील होते. ते मराठीत बोलत असल्याने दरोडेखोर मराठी व आसपासचे अथवा माहितगार असावेत असा अंदाज आहे.
पहाटे तीनसव्वातीनच्या सुमारास हा दरोडा पडला. दरोडेखोर जाताच अग्रवाल कुटुंबीयांनीच विवेकानंद चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तात्काळ पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. दुपारपर्यंत तरी नेमका किती ऐवज चोरीस गेला याची अधिकृत माहिती हाती आली नसली तरी सुमारे अडीच कोटी रूपये रोख, एक ते दीड किलो सोन्याचे दागिने गेले असावेत असा प्राथमीक अंदाज आहे. लातूर जिल्हा निर्माण झाल्यानंतरचा हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा दरोडा आहे. स्वतः पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, शहर पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे, स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, श्वान पथक घटनास्थळी पोहचले आहेत. श्वानाने चोरटे कातपूरच्या दिशेने गेल्याचा माग दाखविला. माहितगार दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असावा असा अंदाज आहे. राजकमल अग्रवाल यांच्या कातपूर रोड परिसरातील कन्हैया नगर भागात अलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूस मंदीर आहे. तेथून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असण्याची शक्यता आहे. या बंगल्याच्या परिसरात सीसीटीव्ही दिसत होते. पण ते चालू नसल्याचे सांगण्यात आले. या बंगल्यावर वॉचमनही आहे. पण दरोडेखोरांनी हा दरोडा शांतपणे टाकला. वॉचमनला तर आपण वॉचमन असलेल्या बंगल्यात दरोडा पडल्याचे सकाळी माहित झाले, असे समजते. आजपर्यंतच्या दरोड्यातील हा सर्वात मोठा दरोडा मानला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे गजानन भातलवंडे, विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आदिसह प्रचंड पोलीस फौजफाटा घटनास्थळी भेट देवून पोलीसांनी चौकशीसाठी अत्यंत तत्परतेने सुत्रे हालवली आहेत. या दरोड्याचा तपास सर्वांगाने केला जात आहे. अशा प्रकारचा एवढा मोठा दरोडा लातूर जिल्ह्यात या अगोदर कधीही पडला नसल्याचेही समजते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








