(साटेली भेडशी प्रतिनिधी)
कोनाळ तिलारीवाडी येथील शंकर शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी त्यांचा मुलगा शेतातील साफसफाई करण्यासाठी गेला असता निदर्शनास आली.त्यांच्या शेतातील विहीर ही कठडा नसलेली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात आलेल्या गव्यांना अंदाज न आल्याने नर व मादी अशा दोन गव्यांचा त्या संरक्षक कठडा नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीत पडलेले गवे हे कुजलेल्या अवस्थेत असल्याने चार ते पाच दिवसांपूर्वी पडले असल्याचा अंदाज आहे.
त्यानंतर या घटनेबद्दल वनविभागाला माहिती देण्यात आली.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी दोडामार्ग वनक्षेत्रपाल वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, वनपाल किशोर जंगले ,विश्राम कुबल, प्रकाश गवस ,बाळकृष्ण सावंत,आदी उपस्थित होते. या घटनेचा पंचनामा केला तसे मृत गवे विहिरीबाहेर काढण्याची कार्यवाही सुरू होती.









