मणिपूरमधील घटना : स्वत:ही गोळी झाडून केली आत्महत्या : अन्य 8 जवान जखमी
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील एका छावणीत गुरुवारी रात्री एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत एकूण 3 सैनिक ठार झाले आणि 8 जण जखमी झाले. या सर्वांना इंफाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रिम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी छावणीत पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सैनिकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी उपाययोजनांचा देखील विचार केला जाऊ शकतो.
गोळीबाराची ही घटना गुरुवारी रात्री 8:20 वाजता इम्फाळ पश्चिम जिह्यातील लामफळ येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी हवालदार संजय कुमारने त्याच्या सर्व्हिस रायफलमधून गोळीबार केला. यामध्ये एक कॉन्स्टेबल आणि एक सब-इन्स्पेक्टर जागीच ठार झाले. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सैनिक सीआरपीएफच्या 120 व्या बटालियनचा सदस्य होता. सध्या घटनेची कारणे तपासली जात आहेत. सीआरपीएफकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र, या घटनेचा मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट किंवा हिंसाचाराशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागील कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही 23 जानेवारी 2024 रोजी मणिपूरच्या चांदेल जिह्यातील साजिक टम्पाक येथे आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या 6 सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.









