सातारा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा लवकरच कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे हालचाली गतीमान झाल्या आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेच्या 65 तर 11 पंचायत समितीच्या 110 गणांची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. गतवेळच्या पेक्षा जिल्ह्यातील दोन गट व चार गण कमी झाले आहेत. या प्रारुप रचनेवर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्या दि. 21 पर्यंत दाखल करावयाच्या आहेत.
यंदाची निवडणूक 65 जिल्हा परिषद गटांसाठी आणि 110 गणासाठी आता होणार आहे. तब्बल सात वर्षानंतर या निवडणुका होत असल्यामुळे जिह्यातील स्थानिक आमदार, मंत्री, खासदार यांचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्याकडे नजरा आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या या निवडणुका आपल्याच गटाच्या ताब्यात कशा राहतील यासाठी पक्ष मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीत भाजपा शिवसेनेमध्ये विस्तव फुलून सवतासुभा होतो की महायुतीमधूनच या निवडणुका लढल्या जातील. स्थानिक विकास आघाड्या नेमके काय करणार याकडे नजरा लागून राहिल्या आहे.
जिल्हा परिषद गट आणि गण यांचा प्रारुप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. पूर्वी 67 गट होते, त्यातील दोन गट कमी होऊन 65 गटाचा हा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. तसेच गणाच्या बाबतीतही झाले असून काही 4 गण कमी झाले आहेत. 110 गणाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. जिह्यातील काही ग्रामपंचायती या नगरपंचायती झाल्या तसेच हद्दवाढ झाल्याने काही गावांचा शहरात समावेश झाला. त्यामुळे दोन गट आणि चार जणांचा समावेश नजीकच्या नगरपंचायत व शहरी भागात झालेला आहे. त्यामुळे सात वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीच्या लगबगीला वेग आलेला आहे. प्रारूप आराखडा जाहीर होताच, आपला गण, गट सुरक्षित आहे का, आपल्या पक्षाला वातावरण कसे आहे, नेमके राजकारण कसे करता येईल, तर्कवितर्क सुरू झालेले आहेत.
सध्या जिह्यामध्ये भाजपचे प्राबल्य आहे. शिवसेना महायुतीतला पक्ष असला तरी काही ठिकाणी भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये वादविवाद आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये एकी राहणार की सवतासुभा होणार हे आत्तापासूनच व्यूहरचना सुरू झालेले आहे. भाजपचे जिह्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे तर शिवसेनेच्या शंभूराज, अजितदादा गटाचे मकरंद आबा असे चार मंत्री आहेत. या चारही मंत्र्यांकडून आपल्या ताब्यात पंचायत समिती कशी राहील याची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी एकीची मोट बांधून आपल्या ताब्यात कशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राखता येईल यासाठी व्युहरचना सुरु झाली आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या आराखडा यादीत आपल्या विचाराची गावे आहेत का, नव्याने आलेली गावे आपली कशी करता येईल याचीची चर्चा राजकीय मंडळीमध्ये सुरु झाली आहे.








