बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर कारवाई : सीमा हैदर घटनेनंतर अधिक सतर्कता
वृत्तसंस्था/ .ऐझवाल
नेपाळ सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चिनी नागरिकांना बिहारमधील रक्सौल येथून अटक करण्यात आली आहे. दोघांचा हेतू कळू शकलेला नाही, पण ते हेरगिरीसाठी भारतात येत असल्याचा इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा संशय आहे. मे महिन्यात सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला तपास यंत्रणांना चकवा देऊन नेपाळच्या सीमेवरून विनाव्हिसा भारतात घुसल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर सतर्कता वाढवली आहे. त्यापासून सर्व भारत-नेपाळ सीमेवर कडक तपासणी सुरू असताना दोन चिनी नागरिक तपास यंत्रणांच्या ताब्यात सापडले आहेत.
सीमा हैदरने खोटी भारतीय ओळखीची माहिती देऊन भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर सीमेवर कडक तपासणी सुरू झाली आहे. याचदरम्यान व्हिसा आणि पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 चिनी नागरिकांना पकडण्यात आले आहे. दोन्ही चिनी नागरिकांना नेपाळमधून भारतात प्रवेश करताना पूर्व चंपारण जिह्यातील रक्सौल येथे भारतीय इमिग्रेशन विभागाने भारतीय सीमाशुल्क कार्यालयासमोर पकडल्यानंतर दोघांना तपासासाठी इमिग्रेशन कार्यालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोन्ही चिनी नागरिकांकडे वैध व्हिसा नसल्याचे आढळून आले आहे. तसेच यापूर्वीही त्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन चिनी नागरिकांना रक्सौल इमिग्रेशन विभागाने 2 जुलै रोजी वैध व्हिसाशिवाय नेपाळमधून भारतात प्रवेश करताना पकडले. प्रथमच बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यानंतर दोघांनाही त्यांच्या पासपोर्टवर इशारे देऊन भारतात येण्यासाठी भारतीय व्हिसा आणण्याचा सल्ला देण्यात आला. 22 जुलै रोजी या दोघांनी पुन्हा पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना भारतीय इमिग्रेशन विभागाने पकडले आणि पुढील कारवाईसाठी रक्सौलच्या हरैया पोलिसांच्या ताब्यात दिले.









